✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी
मुंबई:- अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. तेव्हा पासून अंधेरी पूर्वची ही जागा रिकामी आहे. आता या विधानसभा निवडणुकीचा सामना होणार आहे. त्यामुळे बीजेपी आणि शिवसेना यांनी कमर कसली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनुवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात प्रसिद्धीपत्रक काढत याबाबतची माहिती दिली आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 3 नोव्हेंबरला मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अधिकृत पत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल
या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा थेट सामना रंगणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहे. भाजपने पालिका निवडणुकीआधी ही पोटनिवडणूक फार प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीची जबाबदारी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना दिली आहे.
त्यामुळे भाजप ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतेय. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांना लोकांचा पाठिंबा असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता अंधेरी पूर्व मतदारसंघाचा आमदार कोण होणार, हे लवकरच ठरणार आहे.

