संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी प्राविण्य संपादन करून उज्ज्वल भविष्य घडवावे, या उद्देशाने इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, राजुरा येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध ऑलिंपियाड परीक्षांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकूण ५३ पदकांची घवघवीत कमाई करत अभूतपूर्व यश मिळवले.
नवी दिल्लीतील सिल्वर झोन ऑलिंपियाड, सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन, बेंगळुरू येथील नॅशनल टीचर्स कौन्सिल तसेच मुंबईच्या हिंदी विकास मंच या संस्थांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये गणित, विज्ञान, हिंदी, संगणक, सामान्यज्ञान अशा विविध विषयांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची चमक दाखवली. यातून २९ सुवर्ण, १३ रौप्य व ११ कांस्य पदकांची श्रीमंती शाळेच्या नावावर जमा झाली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्रे व पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, सचिव अरुण धोटे व अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मंजुषा अलोने व सिमरन कौर भंगू यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बर्डे व अमर मेश्राम यांनी केले, तर आभारप्रदर्शन विद्या चौधरी यांनी मानले. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

