✒️प्रशांत जगताप, संपादक
नागपूर:- 5 ऑक्टोबरला अशोक विजया दशमी दिनी सर्व बौद्ध बांधवांसाठी खास असलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी देश व विदेशातून लाखो बौद्ध बांधव नागपुरातील दीक्षाभूमीमध्ये एकत्र जमतात. इथं ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवंदन करतात.
दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं. काल नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलें हे बोलत होते.
‘संघावर बंदी आणण्याची गरज नाही’
मंत्री रामदास आठवले पुढं म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. ते आंबेडकरांचा फोटोही वापरतात. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. “पन्नास खोक, एकदम ओके म्हणणारे आहेत बोके त्यांना नाही डोके…” अशी कविता सांगत आठवलेंनी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली, असा आरोपही त्यांनी लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमी दिनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना दीक्षा दिली होती. ही जगाच्या इतिहासात रक्ताचे एक थेंब न सांडवणारी अशी न भूत न भविष्य अशी क्रांती होती. या धम्म दिक्षेमुळे लाखो नागरिकांना बळ मिळाले. त्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचं औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत. आतापर्यंत लाखो बांधवांना दीक्षा दिलीय.
महाराष्ट्र संदेश न्युज आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला आजच फॉलो करा..
प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348