मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२५:
वैद्यकिय क्षेत्रातील नामांकित आधुनिक उच्च तंत्रज्ञानयुक्त अठरा मजली सुप्रसिध्द शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट – वडाळा, मुंबई यांच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून निस्वार्थ भावनेने नेत्र आरोग्य सेवेचे कार्य करणाऱ्या सर्व हेल्थ पार्टनर यांचा सन्मानपूर्वक गौरव म्हणून दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजे लहानांचा आवडता बाल दिवस निमित्ताने “वर्ष २०२५ – हेल्थ पार्टनर डे” हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे संचालक, नेत्रतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळ, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नेत्र आरोग्य सेवेत योगदान देणारे स्वयंसेवक उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांत इन्स्टिट्यूटने मुंबई आणि उपनगरांतील एक लाखाहून अधिक गरजू नागरिकांपर्यंत नेत्र आरोग्य सेवा पोहोचवली आहे. या सेवेमध्ये नेत्र तपासणी, चष्मे वितरण, नेत्ररोग निदान तसेच मोतीबिंदू आणि इतर गंभीर नेत्ररोगांच्या उपचारांची सुविधा पुरविण्यात आली.
कार्यक्रमात गेल्या दोन वर्षांतील एकत्रित कार्याचा आढावा घेण्यात आला. नवजात शिशूंमध्ये होणाऱ्या ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युअर बेबी’ या आजाराच्या निदान व प्रतिबंधासाठी संस्थेने हाती घेतलेल्या विशेष उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच अंधत्व आलेल्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या सामाजिक प्रकल्पांचीही माहिती सादर करण्यात आली.
हेल्थ पार्टनर प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि यह जनजागृती अभियान भविष्यात अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व हेल्थ पार्टनरना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या अथक सेवेबद्दल आभार मानण्यात आले.
विशेष आकर्षण म्हणून कलावंत ग्रुप मुंबई यांच्या मार्फत सादर केलेल्या “ह्यूमन पपेट शो” या मनोरंजक कार्यक्रमातून उपस्थितांना शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या एकूण नेत्र आरोग्य सेवा उपक्रमांबाबत आणि हेल्थ पार्टनरच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत प्रबोधन करण्यात आले. शेवटी उपस्थित मान्यवर, सोशल हेल्थ पार्टनर आणि हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिलेल्या प्रत्येक घटकांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.

