विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र. 9421856931.
एटापल्ली : तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या ई-पीक नोंदी तांत्रिक कारणास्तव अद्ययावत न झाल्यामुळे धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना धान विक्रीस नकार दिला जात असल्याची गंभीर बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज तहसीलदारांना निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
शासकीय प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांचे ई-पीक नोंदी ऑनलाइन प्रलंबित आहेत. मात्र, ही शेतकऱ्यांची कसलीही चूक नसताना त्यांच्या धानाची खरेदी नाकारली जात असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अन्यायकारक कारभाराविरोधात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात शेतकऱ्यांचे धान कोणत्याही विलंबाशिवाय स्वीकारण्यात यावे, ई-पीक नोंदी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचे होणारे हंगामी नुकसान तत्काळ थांबवावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना अक्षय पुंगाटी शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली, नामदेव हिचामी शहर प्रमुख, प्रशांत तलांडे तालुका समन्वयक, नत्तू दुर्वा शाखा प्रमुख, ज्ञानेश्वर पुंगाटी, संदीप कालंगा, राकेश लेकामी यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

