मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आलापल्ली–सिरोंचा नॅशनल हायवेपासून झिम्मेला गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्या वेळी रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, कालांतराने रस्त्याची देखभाल न झाल्यामुळे आज संपूर्ण रस्त्यावर गिट्टी पसरलेली असून डांबर पूर्णपणे निघून गेल्याचे चित्र दिसत आहे.
या खराब रस्त्यामुळे झिम्मेला गावातील नागरिकांना रोज तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. बाजारपेठ, दवाखाना तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर सैल गिट्टी असल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गावातील वाहनधारकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “रस्त्यावर गिट्टी असल्यामुळे वाहन चालवणे खूप कठीण झाले आहे. ब्रेक लावल्यावर वाहन घसरते आणि अपघात होण्याची भीती कायम असते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते.”
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

