मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी ===
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरीमध्ये शिक्षणाची नवी पहाट फुलवणाऱ्या ‘लक्ष्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ तर्फे रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्थानिक राजे धर्मराव सायन्स कॉलेज अहेरी येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा शासकीय नोकरीत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तब्बल २२ यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
या प्रेरणादायी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चिन्नाजी चालूरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहेरीच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली कांबळे मॅडम सेवानिवृत्त शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. बबलू सडमेक सर आणि श्रीमती विद्या दहागावकर मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील प्रशासकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ही अकॅडमी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे ‘दीपस्तंभ’ ठरत आहे, यावर आपले विचार मांडले.
शून्यातून निर्माण केले विश्व: लक्ष्य अकॅडमीची यशोगाथा
लक्ष्य स्पर्धा परीक्षा अकॅडमीची ख्याती ‘शून्यातून विश्व निर्माण करणारी संस्था’ अशी आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान किंवा बाह्य निधी उपलब्ध नसताना, केवळ अहेरी परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दिशा देण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये या अकॅडमीची सुरुवात झाली. सुरुवातीला ज्यांनी स्वतः प्रेरित होऊन या अकॅडमीची धुरा सांभाळली, त्यांनी स्वतः मार्गदर्शन करत आधी स्वतः रोजगार प्राप्त केला आणि शासकीय नोकरी मिळवली.
हाच वारसा पुढे चालवत आज ही संस्था कित्येक गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य व दर्जेदार मार्गदर्शन करत आहे. दरवर्षी या अकॅडमीतून ५ ते १० विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होत होते, मात्र यावर्षी अकॅडमीने नवा विक्रम प्रस्थापित करत तब्बल २२ विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवून दिली आहे. ही कामगिरी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी कौतुकास्पद ठरली आहे.
सेवाभावी शिक्षकांचे अविरत परिश्रम
स्वतः शासकीय नोकरीत उच्च पदांवर कार्यरत असूनही, अहेरी परिसरातील तरुण मागे राहू नयेत म्हणून अनेक मार्गदर्शक या अकॅडमीला पुढे नेण्याचे निस्वार्थ कार्य करत आहेत. प्रामुख्याने: राजश्री शाहू महाराज मागसलेले बहूउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री गिरीश मध्यार्लावार सर यांनी सन 2008 पासून होतकरू व गरीब विद्यार्थीना शिक्षणाची ओळ लागावी म्हणून त्यांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देत होते. हेच वारसा टिकवून ठेवण्याचे निशूल्क योगदान लक्ष्य एकेडमी द्वारे सुरू आहे यात या कूशाग्र बूद्धीमता व काहीतरी आपणांस समाजासाठी चागले करण्याकरीता या व्यक्तीनी ही परंपरा कायम ठेवले आहे.
श्री. विनोद दहागावकर सर
श्री. सतीश पानगंटीवार सर श्री शूभम निलम सर
ॲडव्होकेट दहागावकर सर
श्री. गणेश सर
श्री. प्रशांत गुरू सर
श्री. सागर गाऊत्रे सर श्री अश्विन मडावी सर
श्रीमती विद्या दहागावकर मॅडम
श्री. अंकेश मडावी सर
श्री. त्रिशूल डांगरे सर
या सर्व मार्गदर्शकांच्या अविरत कष्टामुळेच आज लक्ष्य अकॅडमी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे.
संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उपक्रम
अतिदुर्गम भागात स्पर्धा परीक्षांचे वातावरण तयार करून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा लक्ष्य अकॅडमीचा हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कु. अनूष्का कूडकेलवार व श्री. सागर सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचलन श्री. विनोद सर यांनी मानले. या सोहळ्याला तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, पालक आणि सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

