अर्ज दाखल करायला अवघे काही तास शिल्लक असताना मुरजी पटेल कुणाचे उमेदवार असणार? हा प्रश्न आहे. पटेलांचं नाव नक्की आहे.
✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी
मुंबई,13 ऑक्टोबर:- अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल करायला अवघे काही तास शिल्लक असताना मुरजी पटेल कुणाचे उमेदवार असणार? हा प्रश्न आहे. पटेलांचं नाव नक्की आहे, पण त्यांच्या हाती कमळ असणार, का ढाल-तलवार? याकडे लक्ष लागलं आहे. याबाबत आज रात्री बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करणं आणि प्रचार करणं याआधीच निवडणुकीत रंग भरायला लागले आहेत.
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक प्रचाराआधीच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली. मुरजी पटेल यांनी तयारीही केली, पण निवडणुकीचा रागरंग पाहून शिंदे आणि फडणवीसांनी रणनिती बदलली आहे. फडणवीसांनी शिंदेंसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.
ऋतुजा लटकेंना सहानुभुती मिळू नये, याची पुरेपूर काळजी भाजप आणि शिंदेंचा पक्ष घेत आहे, त्यामुळेच पटेल यांना ढाल-तलवार या चिन्हावर लढण्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, पण त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना झाल्यास ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच मुरजी पटेलांना शिंदेंच्या पक्षाकडून रिंगणात उतरवून शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत घडवून आणण्याची रणनीती असल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे मुरजी कोणत्या पक्षाकडून लढणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

