महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर :- गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर शहरा मध्ये बसस्थानकासमोर रस्त्यावर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने हटवले आहे. मंगळवारपासून सलग ही कारवाई सुरू आहे. आता किती दिवस ही परिस्थिती राहील, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सध्या तरी बसस्थानकासमोरील रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
बसस्थानकासमोरून जाणाऱ्या शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर अगदी रस्त्यावरच हातगाड्या, फळ विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे रस्ता अरुंद केला होता. अतिक्रमणांचा सुळसुळाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मंगळवारपासून येथील अतिक्रमण हटविले आहेत. सध्या तरी बसस्थानकासमोरील हा रस्ता मोकळा दिसत आहे.
भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, हॉकर्स, खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांचे आणि रस्त्यांचे विद्रूपीकरण केले आहे. सध्या बसस्थानकासमोर कारवाई झाली असली तरी शहरातून जाणारा जुना पुणे- नाशिक महामार्ग प्रवरा नदीच्या मोठ्या पुलापासून ते थेट घुलेवाडी फाट्यापर्यंत दुतर्फा अतिक्रमणांनी वेढलेला असतो.
संगमनेर शहरांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुने कटारिया क्लॉथ स्टोअर, मोमीनपुरा, बाजारपेठ, अशोक चौक, चावडी, मेन रोड या परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. अनेक दुकानदार आपल्या दुकानातील सामान थेट रस्त्यावर मांडतात. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नवीन नगर रोडवरील मोठमोठ्या दुकानांनी आणि व्यावसायिक गाळेधारकांनी पार्किंगसाठी जागाच सोडली नसल्याने रस्ते अडथळ्यांनी भरलेले असतात.
नगरपालिका हे अतिक्रमण हटवत असताना गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण काढू नये म्हणून माजी नगरसेवकांनी, माजी नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतल्या लोकांची अतिक्रमणे काढू नयेत असे फोन केले. मात्र, सर्वांवर सरसकट कारवाई करण्यात आली. आता पुन्हा येथे हातगाड्या लावण्यासाठी आणि दुकाने टाकण्यासाठी दिवाळीचे कारण पुढे करून नगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव आणला जाऊ शकतो, अशा प्रतिक्रिया संगमनेरकरांमधून येत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

