विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे. त्यासाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे.
गेल्या बारा दिवसांत फक्त 124 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संगमनेर तालुक्यासह अकोले, नेवासा, शेवगाव व पाथर्डी या पाच तालुक्यांत अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने गेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी रदृ केली असून, नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरु झाली. जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या आणि 31 ऑक्टोबर 2019 पूर्वी पदवीधर झालेल्या व्यक्तीला मतदार नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत फक्त 124 पदवीधर व्यक्तींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल झालेले आहेत.
मतदार नोंदणीसाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील व मंडलाधिकारी कार्यालयांत व्यवस्था करण्यात आली. मात्र, मतदार नोंदणीसाठी पदवीधर व्यक्तींनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीसाठी 85 हजार 286 मतदारसंख्या होती. सर्वाधिक 18 हजार 898 मतदारसंख्या एकट्या संगमनेर तालुक्याची होती. त्या खालोखाल नगर शहर मतदारसंघात 12 हजार 890 मतदार होते. मात्र, नवीन मतदार नोंदणीला म्हाणावी अशी सुरुवात झाली नाही. संगमनेर, अकोले, नेवासा, शेवगाव, व पाथर्डी पाच तालुक्यांत मतदार नोंदणीचे अद्याप खाते उघडले नाही. 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची मुभा आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
व्यक्तिगत स्तरावर नोंदणीस टाळाटाळ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दर सहा वर्षांनी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र, कार्यबाहुल्यामुळे दर निवडणुकीला मतदार नोंदणीचा अर्ज भरण्यास पदवीधर व्यक्ती टाळाटाळ करीत आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच निवडणुकीस इच्छूक असणार्या व्यक्तींच्या वतीने मतदार नोंदणी केली जाते. मात्र, राजकीय पक्षांकडून वा व्यक्तींकडून मतदार नोंदणीचे एकगठठा अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.त्यामुळे मतदार नोंदणीस अल्प प्रतिसाद दिसून येत असल्याची चर्चा आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348