सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ बल्लारपूर तर्फे दिनांक: 20/10/2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता विजयादशमी बाल उत्सव, न. प. बालोद्यान गणपती वार्ड बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला होता. मंचावर प्रमुख वक्ता श्री. संजय दानेकर (स्वयंसेवक), प्रमुख पाहुणे श्री. राजू वानखेडे (शिक्षक), प्रमुख उपस्थिती श्री. विवेक गडकर (तालुका संघचालक), श्री. वैभव चिताडे (नगर कार्यवाह) यांची होती.
प्रथमता: शस्त्रपूजन करण्यात आले. नंतर परमपूज्य भगवा ध्वजारोहण करण्यात आले. मंचाच्या बाजूला प्रथम सरसंघचालक डाॅ. केशवराव हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधवराव गोवळकर गुरुजी यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. मैदानावर प्रात्यक्षिके दाखवण्यात आलीत. त्याचे संचालन कैवल्य देवपुजारी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये सुभाषित, अमृतवचन आणि वैयक्तिक गीत स्वंयसेवकांतर्फे सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राजु वानखेडे यांनी उपस्थित स्वंयसेवकांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थी हे बाल्यावस्थेमध्ये आहे म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेमध्येच होतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राष्ट्र प्रेमातून राष्ट्र निर्माण करणे शिकवते आणि अवतीभवतीच्या समस्या सोडवून सामाजिक कार्य करते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री. संजय दानेकर (स्वंयसेवक) यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, भारत एवढे सबळ राष्ट्र असताना गुलामीत कसे गेले. यासाठी भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली. भारत भूमीचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय ठरवण्यात आले. त्यासाठी संस्कार आणि सुरक्षा आवश्यक आहे. पवित्रता आणि शांती साठी शक्तीचा आधार घेण्यात आला. भारतामध्ये परंपरा चालल्या पाहिजे, परंतु रूढीवाद चालता कामा नये.
परिवर्तनाने देश समोर जातो आहे आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने नेहमी परिवर्तन स्वीकारले आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या प्रत्येक शाखेत नेहमी संस्कार दिले जातात. सध्या नवीन शिक्षण नीती ही भारताने स्वीकारली आहे आणि त्यामध्ये मातृभाषा मध्ये शिक्षण दिले पाहिजे असे ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये सद्बुद्धी जागृत होते. दया, करुणा, अंतर्बाह्य स्वच्छता आवश्यक आहे. संघ काहीच काम करीत नाही, परंतु संघाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी स्वंयसेवक झटतात.
समाजवादामध्ये काम करणारे आणि काम न करणाऱ्याला एकत्र आणल्या गेले होते आणि ते राष्ट्राच्या विकासात बहुमूल्य योगदान साबित होणार नाही असे लक्षात आले. हिंदुराष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मावर आधारीतच शिक्षण प्रणाली पाहिजे, त्यामध्ये न्याय, नीती, आचार, विचार याची जडणघडण होणार आणि राष्ट्रभक्तीसाठी योगदान साबित होणार. राष्ट्राची एकात्मता आणि समरस साठी राष्ट्रजीवन व्यतीत करणे आवश्यक आहे. यासाठी मोठे मन, मस्तिष्क, मनगट आणि स्वजागृती आवश्यक आहे. कार्यक्रमाचे संचालन श्री. संजय निषाद (मुख्य शिक्षक) यांनी केले. कार्यक्रमाला बाल स्वंयसेवक व गण्यमान्य व्यक्ती उपस्थित होते.

