श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना खा.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील दादासाहेब वांढरे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कांताबाई झगडे यांच्या कुटुंबाला देखील त्यांनी धीर दिला. पाटोदा तालुक्यातील डोंमरी, डोंगरकिन्ही येथे ही खा.प्रितमताई मुंडे यांनी सांत्वन भेट दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून खा.प्रितमताई मुंडे यांनी अपघाती निधन झालेल्या शेतकरी कुटुंबाना धीर दिला. माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव , शिरूर तालुक्यातील दगडवादी येथे वीज पडून निधन झालेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
नदी ओलांडून पालकमंत्री सावेंसोबत खा. प्रितमताई भानकवाडीत
शिरूर तालुक्यातील भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली आणि एका नातेवाईकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. मुलींच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळेलेल्या सोनसळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे पालकमंत्री अतुल सावे यांनी दुर्गम भागातील भानकवाडी गावाला भेट दिली. नदी आणि ओढे ओलांडून, चिखल तुडवत भानकवाडी गावात दाखल होऊन त्यांनी शोकसंतप्त परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश ही सुपूर्द केला. बीड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीने आपण व्यथित झालो आहोत अशी भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348