मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी राष्ट्रपती पदक विजेते शहाजी उमाप यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
तर विद्यमान पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त औरंगाबाद या ठिकाणी बदली झाली आहे.
गृहविभागाने राज्यातील 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या तर, 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही. या बदल्यांमध्ये नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सीआयडी अधीक्षक म्हणून बदली केली आहे. पाटील यांच्या बदलीसंदर्भात गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्यांची बदली होऊन त्यांच्या रिक्त जागी मुंबईतील व्हीआयपी सुरक्षा विभागाचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाच्या कॅट आदेशान्वये उमाप यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
गेल्या वर्षी 09 सप्टेंबर 2021 रोजीच्या गृह विभागाच्या आदेशान्वये अधीक्षक सचिन पाटील यांची मुंबई येथे राज्यगुप्ता वार्ता विभागाचे अधीक्षक म्हणून बदली झाली होती. तर उमाप यांची नाशिक ग्रामीणचे अधीक्षकपदी नियुक्ती केली होती. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली केल्याच्या विरोधात पाटील यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीला मॅटने स्थगिती दिली होती. या स्थगितीबाबत मॅटने गेल्या महिन्यात निकाल देताना स्थगिती उठविली होती, आणि शासनाला पाटील यांच्या बदलीचे आदेश देताना उमाप यांची नियुक्ती महिनाभरात करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशानुसार, उमाप यांनी आडगाव पोलीस मुख्यालयात हजर होत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
नांदेड जिल्हा तंटामुक्त करणारे पोलीस अधिकारी
कडक व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाजी उमाप यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात 1996 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करत उप अधीक्षकांत प्रथम येण्याचा मान मिळवला होता. आंबेजोगाई लातूर कोल्हापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून तसेच कोल्हापूर व नांदेड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळी त्यांच्या कारकीर्दीत 2012 मध्ये तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजाराहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली होती पिंपरी चिंचवड नवी मुंबई येथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले त्यांना यादी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे.