विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- अहमदनगर-मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा आठवड्याभरात निघेल. १ जानेवारीला रस्त्याचे काम सुरू होईल, मात्र आता पुन्हा कोणी या रस्त्याच्या कामात ठेकेदाराला टक्केवारी मागितली तर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर करेल, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
अहमदनगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत केंद्राच्या एका पथकाने आज पाहणी केली आहे. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिंगवे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली येथील अधिकारी एस. के. मिश्रा, आशिष आसाटी, पी. जी. खोडस्कर, अंशुमती श्रीवास्तव, प्रफुल्ल दिवाण, एम. एस. वाबळे, दीपेंद्र राठोड, दिग्विजय पाटणकर आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, अहमदनगर -मनमाड रस्त्याच्या कामासाठी पुढील आठवड्यात सुमारे ८०० कोटी रुपयांची निविदा निघणार आहे. रस्त्याच्या वरील खड्डे बुजविण्यासाठी ८ कोटी रुपये आणले आहेत. त्यानुसार कारपेटींगचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहे. कोणीही खासदार व लोकप्रतिनिधी स्वतः हून जाऊन रस्ता खराब करत नाही. तर उड्डाणपूल पूर्ण झाला नसता. बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्णत्वास आले नसते. ठेकेदार नेमणे खासदाराच्या हाती नसते. अहमदनगर-मनमाड रस्त्यामुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल मी जनतेची माफी मागतो. आम्ही केलेल्या कामाला ठेकेदारांकडून म्हणावी, तशी साथ मिळाली नाही. मात्र रस्त्याच्या कामाची निविदा पुढील आठवड्यात निघेल. नव्या ठेकेदाराकडून १ जानेवारीला रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
नवीन ठेकेदार नेमण्याचा अधिकार ई टेंडरींग प्रमाणे शासनाला असतो. त्यामुळे साईबाबा चरणी एकच प्रार्थना करेल की या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार जुनाच येऊ नये. नवीन ठेकेदार आल्यावर कोणी टक्केवारी मागण्याचा प्रयत्न केल्यास. मी पत्रकार परिषद घेऊन त्या लोकप्रतिनिधीचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्या शिवाय शांत राहणार नाही आसा इशारा त्यांनी केला त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामात टक्केवारी मागण्याची जी प्रथा मागील काही वर्षांपासून सुरू होती, ती यापुढे होणार नाही. कारण जनतेचे होणारे नुकसान पुन्हा भरून येणार नाही.
नवीन ठेकेदार आल्यावर १ जानेवारी २०२४ पर्यंत रस्ता चांगला केला जाईल. याच निविदेनुसार रस्त्याच्या ७५ किलोमीटरपर्यंतच्या दुरुस्तीचेही काम घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते चांगले होत आहे. अहमदनगर जिल्हा विकासाकडे जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक धोरण ठेवल्यास जिल्ह्यात पुढील काळात निश्चित विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करमाळा रस्त्यासाठी वाईटपणा.
नगर – करमाळा रस्त्याच्या कामाचा वेग घेण्यासाठी काही धार्मिक स्थळांचे स्थलांतर करावे लागेल. त्यासाठीचा वाईटपणा घेत आहे. विकासासाठी वाईटपणा घेण्यास मी तयार आहे. त्याला कोणी धार्मिक, जातीयतेचे स्वरुप दिले तर त्याला मी महत्त्व देत नाही. कोणी रस्त्याच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याचा सामना करून रस्त्याचे काम वेगात पूर्ण केले जाईल, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

