प्रशांत जगताप
मुंबई:- सध्या राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या चर्चांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“या सगळ्या चर्चा केवळ मनोरंजनाचा एक भाग आहे. यातूनच लोकांची काही काळ करमणूक होणार आहे”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
“ही चर्चा म्हणजे केवळ तात्पुरते मनोरंजन. कोणाचं कोणाशी लग्न लावून द्यायचं हे टीव्हीवाले ठरवतात”, अशी मिश्किल प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली.
सध्या महाराष्ट्राचे राजकारणात अनेक चढ उतार बघायला मिळत आहे. जे पूर्वी कट्टर राजकीय वैरी होते ते गळाला गळे लाऊन बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवाच होता. त्यानंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन पक्षातून बंडखोरी करत भाजपचा हात पकडून सत्तापालट करणं अनपेक्षितच होतं.
महाराष्ट्र राज्यातील सत्तापालट झाल्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक नवे राजकीय मित्र भेटत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या मित्र यादीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचंदेखील नाव चर्चेत आलंय.
कारण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे 20 नोव्हेंबरला प्रबोधकार ठाकरे यांच्याशी संबंधित एका कार्यक्रमात एकाच मंचावर येण्याची चर्चा आहे. त्यामुळे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. पण या सर्व चर्चांवर प्रकाश आंबेडकर यांनी पडदा टाकला आहे.

