नासिर खान, नवीमुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईची फॅशन स्ट्रीट हे रेडिमेड कपड्यांची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. अशाच एका कपड्यांच्या दुकानाला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली आणि काही वेळातच या आगीने विक्राळरूप धारण केल्याने या आगीत अनेक दुकाने जाळून खाक झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून आता आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र 15 ते 20 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
वीकेंडमुळे बाजारात गर्दी वाढली होती आणि मोठी वर्दळ होती. अशा स्थितीत आग लागल्याने अनेक लोक घाबरले. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मेट्रो सिनेमाजवळ ही फॅशन स्ट्रीट आहे जी फॅशनेबल कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे शंभरहून अधिक कपड्यांची दुकाने आहेत. ज्वाला खूप उंचावरून दिसत होत्या. फॅशन स्ट्रीटच्या वर धूर उठताना दिसत होता.
आगीने भीषण रूप केले धारण..
आग वेगाने पसरण्याचे कारण म्हणजे येथील दुकाने एकमेकांना लागून आहेत. कपड्यांची दुकाने असल्याने ती आणखीनच वेगाने पसरली. आग झपाट्याने पसरल्याने स्थानिक प्रशासनाने तात्काळ तेथे उपस्थित लोकांना हटवले आणि संपूर्ण परिसर रिकामा केला. त्यामुळे आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
जीवितहानी झाली नाही..
मात्र आगीत 15 ते 20 दुकाने पूर्णत: जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस पथक आणि बीएमसीचे कर्मचारी आणि अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. आग विझल्यानंतर ज्या दुकानांमध्ये आग पोहोचली नाही, ते दुकानदार आपले कपडे बांधत आहेत.प्रथम एका दुकानातून धूर निघू लागला. कोणाला काही समजेपर्यंत आगीने आजूबाजूच्या दुकानांना कवेत घेतले होते. दुपारचे बारा वाजले होते. अचानक आगीने उग्र रूप धारण केले आणि मोठ्या उंचीवर धुराचे लोट दिसू लागले.

