मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथील देवळाली कॅम्प येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. आईला अश्लील लघूसंदेश व चित्रफित पाठविल्याच्या रागातून एकाने हिंगोलीहून आलेल्या आपल्याचं चुलत भावाची हत्या केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणातील संशयित भावासह त्याच्या तीन साथीदारांना देवळाली पोलीस व गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे.
हिंगोली येथे राहणारा 25 वर्षीय युवक बहिणीला सासरी सोडण्यासाठी भगूर येथे आला होता. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो संशयितांशी भ्रमणध्वनीवर बोलत घराबाहेर पडला. परंतु तो घरी परत लाच नाही. संध्याकाळी भगूर-देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुध्दावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. हा युवक हिंगोलीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या बाबत बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची उकल करताना धक्कादायक बाबी समोर आल्या. मयत व संशयित हे सख्खे चुलत भाऊ आहेत. मयत हा आईला अश्लिल लघूसंदेश व चित्रफित पाठवित असल्याच्या रागातून भावाने साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. त्यातच तो मयत झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित भावासह चार जणांना अटक केली आहे, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

