वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभाग आणि पुणे जिल्हा हौशी अथेलेटिक्स असोसिएशनच्या वतीने २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’, मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाच्या जागृतीसाठी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना विनामूल्य सहभाग घेता येणार आहे. अशी माहिती शुक्रवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागाचे डॉ. विजय खरे, प्रा. विजयकुमार बेंगाळे, बार्टीच्या इंदिरा अस्वाल आदी उपस्थित होते.
यावेळी वाडेकर म्हणाले, “ही संविधान सन्मान दौड शनिवारी सकाळी ६ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संविधान स्तंभ मुख्य इमारतीपासून निघणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये खुल्या गटातील सर्वांसाठी १० किलोमीटर, २० वर्षांखालील मुलामुलींसाठी पाच किलोमीटर आणि १६ वर्षांखालील मुलामुलींसाठी तीन किलोमीटर अशा तीन गटात ही दौड होणार आहे. विनामूल्य नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६५७०७५१२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले.