प्रशांत जगताप विशेष प्रतिनिधी
मुंबई/उस्मानाबादः- संपूर्ण देशात मागील काही वर्षांपासून संत बाबा यांच्या द्वारे महिलेवर अत्याचाराचे मोठे सत्र सुरू आहे. त्यात आता अजुन एका महाराजांची एंट्री झाली आहे. महाराष्ट्रात मोठं प्रस्थ असलेले मलकापूरचे एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजांच्या दर्शनासाठी मठात आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. 28 जुलै रोजी सदर महिला मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी दिली. तसेच ही क्लिप व्हायरल होऊ द्यायची नसेल तर तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी दिली. सदर प्रकाराला महिलेने तीव्र विरोध केला असता महाराजांनी तिच्या अंगावर हात टाकत शिवीगाळही केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आरडाओरड केल्यानंतर शिष्यांची गर्दी जमा झाली, त्यानंतर महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ लोमटे महाराजांविरोधात याआधीदेखील फसवणुकीच्या तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे महिलेची तक्रार?
या प्रकरणी महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ती 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे ती इमारतीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महाराजाचा शिष्य अशोक याने सांगितले, महाराज समोरच्या रुममध्ये बसले आहेत. तुम्हाला आत बोलावलं आहे. रुममध्ये गेल्यावर , तिथे महाराज एकटेच होते. त्यावेळी त्यांनी तुला माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवावे लागतील, असे म्हटले. तसेच मागील वेळी प्रसादातून तुला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तुझ्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. याविरोधात आरडाओरडा केल्यानंतर महाराजांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली.
त्यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर मठात भक्तांची गर्दी जमली. मात्र गर्दीतून महाराजांनी पळ काढला. या प्रकरणी कलम 354,354 अ, 341,323,504 व 506 नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात फार कारवाया झालेल्या नाहीत.