मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- सुरक्षारक्षकाच्या घरातून मोबाईल पळविणा-या चोरट्यास कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाने कायम ठेवली आहे. प्रदिप जगन्नाथ तुपे वय २९ वर्ष, मुळ रा. जगनकवाडी जिल्हा सांगली, हल्ली राजदूत हॉलेट मागे, ठक्करबाजार समोर असे शिक्षा कायम ठेवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निकाला विरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१३ चे न्या.यु.जे.मोरे यांच्या कोर्टात धाव घेतली होती.
संदिपकुमार गहरेश्वर यादव रा.ध्रुवनगर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. यादव हे ध्रुवनगर येथील खंडोबा मंदिर परिसरातील महालक्ष्मी अपार्टमेंट भागात सुरू असलेल्या नवीन बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. बांधकाम व्यावसायीकाने त्यांना वास्तव्यासाठी आपल्या साईटवरच पत्र्यांची रूम बनवून दिली आहे. २७ मार्च २०२२ रोजी रात्री ते नेहमी प्रमाणे साईटवर पाणी मारण्याचे काम करीत असतांना संशयिताने उघड्या घरात शिरून वनप्लस आणि आयटेल कंपनीचे दोन मोबाईल घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंगापूर पोलिसांनी आरोपीस अटक करून तात्काळ दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केल्याने हा खटला कोर्ट क्रमांक चार मध्ये चालला. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तीवादा नंतर आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरोधात आरोपीने क्रिमीनल अपील दाखल केल्याने कोर्ट क्रमांक १३ चे न्या. यु.जे.मोरे यांच्या कोर्टात सुनावणी झाली. पक्षकार आणि सरकारपक्षाच्या युक्तीवादानंतर वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. सरकार तर्फे या खटल्याचे कामकाज अॅड.आर.एल.निकम यांनी पाहिले.

