मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- संपूर्ण नाशिक जिल्हात खळबळ माजवनाऱ्या गोदापार्क परिसरात दारुपार्टी प्रकरणात अजुन एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. दारूपार्टी नंतर मित्रांमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी दि. 16 तारखेला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गोदापात्रात तरंगतांना आढळून आला आहे. दीपक गोपीनाथ दिवे वय 27 वर्ष, रा.भोईरवाडी, चांडक सर्कलजवळ, तिडके कॉलनी, नाशिक असे या तरुणाचे नाव आहे. तो बेपत्ता झाल्याने त्याच्या चौकशीसाठी बोलवलेल्या विजय शिवाजी जाधव वय 32 वर्ष, रा. धात्रक फाटा, पंचवटी या युवकाने विषप्राशन करून रविवारी दि.13 ला आत्महत्या केली होती.
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा तिडको कॉलनीत पत्नी, सासरे व भाऊसोबत राहतो. तो प्लंबिगचे काम करतो. त्याला बुधवारी दि.9 बरे वाटत नव्हते. त्याला उपचारार्थ पत्नी लिलावती हॉस्पिटल, दिंडोरी रोड, म्हसरूळ येथे घेऊन आली. त्यानंतर दोघेजण परत घरी आले. त्यावेळी दीपकला त्याचा मित्र विजय जाधव याचा कॉल आला. त्याने दीपकला पार्टीसाठी बोलवले होते. त्यानुसार दीपक व त्याचा मित्र आशिष आंबेकर हे दोघे बुधवारी दि.९ दुपारी 4.15 वाजता आशिषच्या रिक्षाने गोदापार्क, सहदेवनगर डीकेनगर येथे दारुच्या पार्टीसाठी गेले. सायंकाळी 6.30 वाजता विजय जाधव, पवन पोटींदे, लाला भामरे हे तिघे दीपकच्या घरी आले. तिघांनी दीपकची पत्नी दीपालीस विचारले की, दीपक घरी आला आहे का. त्यावेळी तिने तो तुमच्यासोबत होता. त्यानंतर तिघे तिला म्हणाले की, पार्टीवेळी दीपकला कॉल आल्याने तो घरी जातो, असे सांगून गेला. नंतर त्याचा मोबाईल स्वीचऑफ झाला. त्यामुळे तिघेजण दीपकच्या घरी आले. त्यानुसार दिपालिने दीपकच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, दीपकचा मोबाईल स्वीचऑफ आला. दीपकचा शोध त्याच्या मित्र व नातेवाईकांनी सुरु केला पण तो कोठेही सापडला नाही. याप्रकरणी दीपाली दीपक दिवे हिने गुरुवारी दि.१० गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेंव्हापासून गंगापूर दीपकचा शोध घेत आहेत.
दारूपार्टीस हजर असलेल्या दीपकच्या मित्रांना चौकशीसाठी बोलवत होते. मात्र, रविवारी दि.13 ला पार्टीत हजर असणारा विजय जाधव याने विषप्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांच्या जाचाला कंटाळून विजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. पोलिसांकडून दीपकचा शोध सुरुच होता. बुधवारी गोदापात्रात दीपकचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दीपकच्या नातलगांसह मित्रपरिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दीपकचा घातपात झाल्याचा संशय नातलगांनी वर्तवला आहे. त्यामुळे दीपकच्या मृत्युचे गूढ अधिकच वाढले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

