महसूल विभाग शासनाचा कणा
उपविभागीय कार्यालयात महसूलदिन उत्साहात
युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. नागरिकांचे सर्व कामे या विभागामार्फत होतात. पारदर्शक काम करुन लोकांपर्यंत पोहचा. त्यांचे समाधान करा. जिल्ह्याची लोकसंख्या दैनंदिन वाढत आहे, याकडे लक्ष केंद्रीत करुन कामाचा आवाका कसा कमी करता येईल यावर भर दया. नागरिकांची कामे जोमाने व वेळेत पूर्ण करा, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. नागपूर (ग्रामीण) उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसिलदार आशिष वानखेडे, नायब तहसिलदार भूपेंद्र कापरे, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना, पांदन रस्ते आदींची कामे कामे जोमाने व वेळेत पूर्ण करा. जबाबदारीची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवणे आवश्यक आहे. त्यानूसार कार्यवाही करुन नागरिकांबद्दल सहकार्यची भूमिका ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
उपविभागस्तरीय कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानूसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठविणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे आदी कामे विहित कालावधीत व अस्तित्वातील वेळापत्रकानूसार करुन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या आपणाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा. आगामी सणासूदीचे दिवस आहेत. त्यामळे नागरिकांच्या कामात कोणताही व्यत्यय येणार नाही याची जाणीव ठेवा. महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने शासनाबद्दल व शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
या दैनंदिन कामासोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर झेंडा या उपक्रम व कोरोनाचा बुस्टर डोस मोहिमेत जोमाने काम करुन उत्सव व मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार नायब तहसीदार भूपेंद्र कापरे यांनी केले.