पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट 1
20 नोव्हेंबर 2022 रोजी चिखली परिसरातील भोसले ब्रदर्स पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची दिवस भरात जमा झालेली रोख रक्कम 8,93,136 रुपये ही पेट्रोल पंप बंद झाल्यावर पेट्रोल पंपच्या ऑफिसमधून चोरट्यांनी लंपास केली. रात्री 10.30 वा ते सकाळी 6 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने लाकडी ड्रॉवर च्या बनावट चावीने लॉकर उघडून रोख रक्कम चोरून नेली होती.
त्यामुळे पेट्रोल पंपचे मालक विशाल भोसले, रा. संभाजीनगर, चिंचवड यांनी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करताना गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे गुन्ह्याच्या ठिकाणी पेट्रोल पंपावर यापूर्वी काम करणारे इसम व त्यांना ज्यांच्यावर संशय आहे.अशा इसमांची बाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी काम सोडून गेलेल्या व त्यांना संशय असलेल्या इसमाबाबत माहिती दिली.
त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून सदर इसमांचे नाव, पत्ते व मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांचे सी.डी.आर काढून त्यांचे विश्लेषण करण्यात आले. यापूर्वी काम सोडून गेलेला इसम नामे अंकित यादव, वय 22 वर्षे, रा. मु. मोहरीया, पो. इटवा, ता. महू, जि. चित्रकूट, राज्य उत्तर प्रदेश याचे वर्णन सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या इसमाशी मिळते जुळते असल्याचे दिसून आले.
तसेच तांत्रिक विश्लेषणामध्ये त्याचा घटनेच्या दिवशी वावर हा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असल्याचे दिसून आल्याने त्याच्याबाबत अधिक संशय बळावला. त्यानंतर त्याचे ठाव ठिकाणाबाबत अधिक माहिती घेताना तो पुणे शहरातून त्याच्या मूळ गावी मोहरीया, पो. इटवा, ता. महू, जि. चित्रकूट, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी जात असल्याबाबतची माहिती मिळाली.
त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस अंमलदार महादेव जावळे, फारुख मुल्ला, गणेश महाडिक, अमित खानविलकर, सचिन मोरे यांच्या पथकाने मोहरीया, पो. इटवा, ता. महू, जि. चित्रकूट, राज्य उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला. त्यावेळेस तो मिळाल्याने त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट 1 कार्यालय येथे आणून त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. त्यानंतर त्या आरोपीला पुढील कारवाई साठी चिखली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी अंकित यादव हा पूर्वी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्यामुळे त्याला पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या रोख रक्कमेबाबत कल्पना होती. त्याने उत्तर प्रदेश येथून येऊन चोरी करून तो रातोरात उत्तर प्रदेश येथे गेल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, रवींद्र राठोड तसेच पोलीस अंमलदार महादेव जावळे, फारुख मुल्ला, गणेश महाडिक, अमित खानविलकर, सचिन मोरे यांच्या पथकाने केली आहे.