✒️राज शिर्के, मुंबई ( पवई ) प्रतिनिधी
मुंबई, 25 नोव्हेंबर:- सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आदी आजार ऋतुबदलानुसार डोकं वर काढत असतात. किरकोळ लक्षणं असतील, तर अनेक नागरिक घरच्या घरीच उपचार करतात. आयुर्वेदिक किंवा घरगुती औषधोपचारांचा फारसा त्रास होत नाही; मात्र स्वतःच्या मनाने अँटिबायोटिक औषधं घेणं, पॅरासिटामॉल गोळ्या घेणं अपायकारक ठरू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेणं किंवा स्वतःच्या मनानं मध्येच ती घेणं बंद करणं रुग्णाला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक औषधं घेऊ नयेत, असं नोएडाच्या फेलिक्स रुग्णालयातल्या मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. रितिका सांगतात. डॉक्टरांनी औषधांचा जितका कोर्स करायला सांगितला असतो, तो रुग्णांनी पूर्ण केला पाहिजे. औषध घेऊन बरं वाटू लागलं म्हणजे आतला संसर्ग निर्माण करणारे विषाणू मेले आहेत असा त्याचा अर्थ होत नाहीत. ते पूर्ण नष्ट होईपर्यंत सांगितल्यानुसार औषध घेत राहिलं पाहिजे. औषध मध्येच थांबवलं, तर त्या विषाणूंमध्ये हळूहळू त्या औषधाशी लढण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे पुढच्या वेळी रुग्ण आजारी पडल्यावर ते औषध प्रभावीपणे काम करत नाही. अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स या स्थितीमध्ये आजार निर्माण करणारे जिवाणू, विषाणू, बुरशी किंवा पॅरासाइट्स औषधांचा प्रतिरोध करू लागतात.
अशा प्रकारे औषधांना प्रतिरोध करण्याची क्षमता विकसित झाल्यास आजार पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यूही होण्याची शक्यता असते. संसर्गजन्य रोगांमध्ये आजाराचा इतरांना संसर्गही होण्याची शक्यता असते.
प्रत्येक आजारासाठी ही औषधं घेऊ नयेत.
- संसर्ग कशा स्वरूपाचा आहे, हे जाणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं या औषधांचं सेवन करावं.
अँटिबायोटिक औषधांचा डोस व त्याचा कालावधी निश्चित असावा.
- औषधांचा कोर्स पूर्ण करावा. मध्येच सोडू नये.
- किडनी किंवा यकृताचा काही आजार असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधं घ्यावीत.
गरजेशिवाय अँटिबायोटिक घेण्यामुळे उलटी होणं, चक्कर येणं, डायरिया, पोटदुखी, अॅलर्जी, योनिमार्गातलं यीस्ट इन्फेक्शन अशा पद्धतीचे परिणाम दिसू शकतात.
योग्य प्रमाणात अँटिबायोटिक न घेतल्यामुळे यकृतावर परिणाम होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत यकृताचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयात वाढत आहे, असं फेलिक्स रुग्णालयाचे एमडी डॉ. डी. के. गुप्ता यांनी सांगितलं आहे. हा संसर्ग वाढल्यास यकृताचं कार्य बंद होतं. चुकीच्या मात्रेत अँटिबायोटिक घेतल्यानं किंवा चुकीच्या औषधासोबत ते घेतल्यानं किडनी व यकृतावर त्यांचा विपरित परिणाम होतो. अँटिबायोटिक औषध केवळ जिवाणू संसर्गामध्येच घेतलं पाहिजे. सर्व चाचण्या करून डॉक्टरांना त्याची गरज वाटल्यास त्यांनी सांगितलं तरच ते घेतलं पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरातल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारे जे 10 घटक सांगितले आहेत, त्यात प्रतिजैविकांचा प्रतिरोध म्हणजे अँटिबायोटिक रेझिस्टन्स हा एक घटक आहे. भविष्यात यामुळे आजारांचा धोका वाढू शकतो.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348