✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
मुंबई, 27 नोव्हेंबर:- राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. अशात आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी गेले आहेत. त्याठिकाणी काल सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. मात्र, या गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 4 मंत्री, चार आमदार आणि तीन खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात काही आमदारांना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर पसरल्याचे पाहायला मिळाले.
आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली. यातच आता गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 11 जणांनी अनुपस्थिती दर्शवल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दौऱ्यात आमदार बच्चू कडू यांनी उपस्थिती दर्शवली. ते गुवाहाटीला जाणार की नाहीत, यावरुन चर्चा रंगली होती.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला गेलेले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंत यांनी आरोग्य शिबिर, तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक आणि शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण देत गुवाहटीच्या दौऱ्याला अनुपस्थिती दर्शवली.
तसेच आमदार संजय गायकवाड, महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही वैयक्तिक कारण देत अनुपस्थिती दर्शवली.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.