मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर देवपूर येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवपूर फाट्या जवळ आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शिर्डीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या मुंबईतील साई भक्तांची तवेरा कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात भाईंदर आणि अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला. तर, सात जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
कल्याण आणि भाईंदर परिसरातील एकमेकांचे नातेवाईक-मित्र असणारे तरुण मंगळवारी साई दर्शनासाठी शिर्डी येथे मुक्कामी थांबले होते. आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जायचे असल्याने ते सिन्नरकडे जात असताना साडेसात वाजण्याच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ तवेरा उलटी झाली. वेगात असलेली तवेरा टायर फुटल्याने जवळपास दोनशे फूट घसरत गेली होती.
या अपघातात इंद्रदेव दया शंकर मोरया वय २५ भाईंदर आणि सत्येंद्र सुखराज यादव वय २१ अंबरनाथ या दोघांचा मृत्यू झाला. तर, त्रिवेंद्र त्रिपाठी आणि रोहित मोरया या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर पाच तरुण किरकोळ जखमी झाले आहे.