वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
पुणे:- शहरात ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदू ज्वराचा पहिलाच रुग्ण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधी पुण्यात आढळून आलेल्या रुग्णाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी आला त्या अहवाला तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णाच्या परिसरातील रुग्णांचे ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे.
पुणे शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे. ही बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील 4 वर्षांच्या मुलावर 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला असून, तो ‘जेई’ पॉझिटिव्ह आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
महापालिकेकडून सर्वेक्षणास सुरूवात:
याबाबत सहायक आरोग्य प्रमुख संजय वावरे म्हणाले की, गेल्या 2 दिवसां पासून हा रुग्ण ज्या भागात सापडला आहे तिथं सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्या रुग्णाच्या घरातील तसेच आजूबाजूच्या घरातील विशेषतः हा 15 वर्षा खालील मुलाचे रक्त नमुने घ्यायला सुरूवात केली आहे. तसेच त्या परिसरात तापाच्या रुग्णांचा सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचा सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे यावेळी वावारे म्हणाले.
रूग्णालयात उपचार सुरू:
आतापर्यंतच्या इतिहासात पुणे शहरात ‘जेई’चा हा पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. याआधी पुण्यात आढळून आले ते जिल्ह्यातील होते. या रुग्णाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या परिसरातील रुग्णांचे ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच क्युलेक्स डासाचीही माहिती घेण्यात येत आहे, असे देखील यावेळी वावरे म्हणाले. या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप व डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून त्याला तापेचा झटका आला. त्यात त्याचा एक हात व पायदेखील कमकुवत झाला. आणि त्याला सुरुवातीला खासगी व नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर हा बालक दहा दिवस रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामध्ये थोडी सुधारणा झाली असून, सध्या तो ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.
अशी या विषाणूची आहेत लक्षणे:
‘जेई’ हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे. त्याला मेंदूज्वर असेही म्हणतात. यामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते. सोबत ताप, डोकेदुखीही असते. याचा प्रभाव १ ते १५ वर्षांच्या वयोगटातील बालकांमध्ये जास्त आढळून येतो. प्रामुख्याने विदर्भात याचे रुग्ण आढळून येत असतात. जिल्ह्यातही पाच वर्षांपूर्वी याचे रुग्ण आढळले होते. पुन्हा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे. ‘क्युलेक्स विष्णोयी व क्युलेक्स ट्रायटनोरिन्क्स’ हे डास याचे प्रसारक आहेत. पाणथळ भागात या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच झोपडपट्टी, जंगल, ग्रामीण भागातही हे डास आढळतात. तसेच डुकरांचा वावर असलेल्या ठिकाणी प्रसाराची शक्यता जास्त असते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

