महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन संगमनेर:- दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत अहमदनगर जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काही मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी मंजूर झालेली विकास कामे थांबविली जात आहे. गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावरील कारवाईच्या नावाखाली दहशतीचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केला.
आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळातही राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध प्रकल्प व योजनांना मंजुरी दिली होती. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली. तर जिल्ह्यातील काही मंडळींनी त्यापुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांनासुद्धा स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे तसेच प्रगतीपथावर असणारे निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम ठप्प झाले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली काही जणांकडून राजकीय कारवाया करत कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करत उद्योग व्यवसायिकांना वेठीस धरले जात आहे. या बेकायदेशीर कारवायांमुळे घरांची, रस्त्यांची तसेच सरकारी कामे सुद्धा बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सध्या शिंदे फडणवीस सरकारच्या सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणाऱ्या आहेत. राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला आहे. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे सोडून ते विकासकामे थांबवित असल्याचा आरोप आमदार थोरात यांनी केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

