श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- लातूर जिल्ह्यातील मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अमर पुंडलिक नाडे वय 45 वर्ष यांचे आकस्मात निधन झाले आहे. मयत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात त्यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भाषण केल्या नंतर स्टेजवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असतानच ही दुर्दैवी घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेतील भाषण झाल्यानंतर काही वेळातच व्यासपीठावरच अमर पुंडलिक नाडे यांचं निधन झाले. या घटनेमुळे ग्रामस्थ धक्क्यात आहेत. गावातील वातावरण बदलून गेलं आहे. गावातील चौका-चौकात लागलेले सगळे बॅनर काढून घेण्यात आले आहेत. मृत अमर नाडे यांची पत्नी सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांना विरोधी पॅनलने जाहीर पाठींबा दिला. मुरुड ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता कोणी ही प्रचारासाठी बाहेर पडत नाही. शनिवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.
काय आहे घटना .. मुरुड ग्रामपंचायत निवडणुक प्रचार सुरु आहे. मुरुडची सरपंचपदाची निवडणूक लढवत असलेल्या अमृता अमर नाडे यांचे पती अमर पुंडलिक नाडे यांनी (14 डिसेंबर) जाहीर सभेत भाषण केलं. सभेत भाषण संपवून अमर नाडे हे खाली आपल्या खुर्चीवर बसले. त्यावेळी शेवटच्या वक्त्याचे भाषण सुरु असताना नाडे यांना अस्वस्थ वाटू लागलं. याची माहिती त्यांनी शेजारी बसलेल्या आपल्या पत्नीलाही दिली. पण काही हालचाल करणार त्या आधीच ते खुर्चीवरुन कोसळले. अमर नाडे यांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले. त्यांना तातडीने मुरुड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून लातूर येथे उपचारासाठी हलवण्या आले पण त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत अशी मुरुडची ओळख आहे. येथील गुराचा बाजार राज्यात नावजलेला आहे. अतिशय सशक्त आणि आर्थिकरित्या मजबूत असलेली ही ग्रामपंचायत आहे. 17 सदस्याची या ग्रामपंचायतची निवडणूक कायमच चर्चेत असते. नाडे परिवाराची कायम येथील राजकारणावर पकड राहिली आहे. मृत अमर नाडे यांचे पॅनल हे भाजपाप्रणित होते. त्यांच्यासमोर दिलीप दादा नाडे यांचे तसेच काँग्रेसप्रणित पॅनल होते. गावात तिरंगी लढत होती.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अक्षरशः एकमेकांचा जीव घेणारी लोक समोरासमोर उभी ठाकतात. मात्र विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच गावातील सर्व बॅनर आणि प्रचार बंद करण्यात आलेला आहे. वेगळ्या स्वरूपातल्या माणुसकीचंही एक दर्शन मुरुड ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत पहावयास मिळालं.
गावात तीन पॅनल आहेत. मागील तीस वर्षापासून सत्ता असलेल्या महाविकास आघाडीप्रणित दिलीपदादा नाडे पॅनेल, भाजपाप्रणित अमर बापू नाडे यांचे पॅनेल आणि काँग्रेसप्रणित पॅनेल. अमर नाडे याचे अकाली निधन झाले आणि आम्ही निर्णय घेतला की सरपंचपदासाठी त्यांना जाहीर पाठींबा देत आहोत. गाव पातळीवरील विषय आहे, लोक भावना आहेत. आमचेही काही नैतिक कर्तव्य आहे असं मत दिलीप नाडे यांनी व्यक्त केलं.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
