✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.28:- समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी महादेवपुरा येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह व उमरी (मेघे) येथे मुलांच्या वसतीगृहास भेट दिली. या ठिकाणी असलेलेल्या सोईसुविधांची त्यांनी पाहणी केली व उत्तम सुविधा असल्याने त्यांनी कौतूक केले.
यावेळी आयुक्तांसह बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य शरद चव्हाण, सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे उपस्थित होते.
या भेटीमध्ये वसतिगृहामध्ये राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी त्यांनी केली. वसतिगृहामध्ये विकसित करण्यात आलेल्या ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडून त्यांना अत्याधूनिक सोई सुविधा उपलब्ध झाल्या. तसेच ई-लायब्ररीमुळे विविध क्षेत्रातील दर्जेदार पुस्तके व संदर्भ साहित्य ई-स्वरुपात एका क्लीकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याने त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाल्याने आयुक्तांनी विशेष कौतुकाची थाप देवून समाधान व्यक्त केले.
या अत्याधुनिक सोईसुविधेमुळे वसतिगृहातील आशुतोष थुल या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी शिक्षणाकरिता आयआयटी खरगपूर येथे झालेली निवड तसेच अजिंक्य काळे या विद्यार्थ्यांची एमबीबीएस करिता पुणे या ठिकाणी झालेली निवड अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी व आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवावा असे कौतुकास्पद उद्गार प्रशांत नारनवरे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधतांना काढले.
वसतिगृहात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आपण लाभ घ्यावा तसेच आपल्या यशाच्या वाटा सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. गृहपाल मुख्यालयी राहत असल्याबाबत तसेच वसतिगृह शंभर टक्के वायफाय सुविधेसह सज्ज केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

