श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातील धारूर तालुक्यातील गांजपूरच्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी पारधी समाजातील कस्तुराबाई साला पवार विजयी झाल्या होत्या. निकालानंतर विजयाचा उत्सव साजरा न करता त्यांनी रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठवत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत पदभार घेणार नाही, अशी भूमिका कस्तुराबाई यांनी घेतली. त्यांच्या रोखठोक भूमिकेपुढे अखेर प्रशासन नमले असून रस्ता करण्याच्या लेखी अश्वासन दिल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
धारूर तालुक्यातील गांजपूर येथे झालेल्या ग्राम पंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत पारधी समाजाच्या कस्तुराबाई साला पवार यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून विजय मिळवला. निकाल लागल्यानंतर बहुतांश सरपंचांनी पदभार स्वीकारला. परंतु त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पदभार न स्वीकारण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
गांजपुर- तांबवा या दोन गावांना जोडणारा रस्ता नसल्यामुळे या परिसरातील पारधी वस्तीवर राहणार्या ग्रामस्थांचे हाल होत होते. हा रस्ता व्हावा, अशी पारधी वस्तीवरील लोकांची अनेक वर्षाची मागणी होती. परंतु त्यांचा आवाज शासन आणि प्रशासनातील अधिकार्यांपर्यंत पोचत नव्हता. दरम्यान, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा पॅनलप्रमुख प्रा. ईश्वर मुंडे यांनी निर्धार केला. आणि कस्तुराबाई यांनी काही ग्रामस्थांना सोबत घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्वस साजरा होत असताना आम्हाला रस्ता नाही. जिल्हा प्रशासन रस्त्याच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत नाही, तो पर्यंत सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नाही, अशी ठोस भूमिका सरपंच कस्तुरबाई यांनी घेतली.
कस्तुरबाईच्या मागणीने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एमजेपीच्या अधिकार्यांना सुचना दिल्या. यानंतर कार्यकारी अभियंता सगर यांनी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेने अधिकृत एजन्सी मार्फत या रस्त्याचे मोजमाप करून डीपीआर बनवण्याचे काम सुरू केले आहे. पुढील मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. असे लेखी पत्र कस्तुराबाई पवार व तहसिलदार धारूर यांना पाठवले. दरम्यान लेखी पत्र प्राप्त होताच कस्तुरबाई पवार यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
पारधी समाजाच्या नवनिर्वाचित सरपंच कस्तुरबाई यांनी रोखठोक भूमिका घेतल्यानंतर त्यांना पॅनलप्रमुख प्रा. ईश्वर मुंडे, सदस्या सुभद्राबाई मुंडे, शालूबाई पारवे, सुंदराबाई पवार, साक्राबाई पवार, गणेश डापकर, विठ्ठल सिरसट, वसंत मुंडे, अंगद डापकर, भिमा पवार, सचिन डापकर, अशोक सिरसट यांच्यासह ग्रामस्थांनी साथ दिली. कस्तुरबाईची भूमिका अन् गावकर्यांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे प्रशासनाला लेखी आश्वासन द्यावे लागले.

