✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- कळवा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पवई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा मध्य रेल्वेवरील कळवा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज भोसले वय ५७ वर्ष, रा. पारसिक नगर, कळवा असे मृत पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
कळवा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तात्काळ त्यांनी या घटनेची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या पाकिटात मनोज भोसले नाव असलेले ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरून सदर प्रवासी पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. ठाणे रेल्वे पोलिसांनी पवई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच भोसले यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले शुक्रवारी दिवसपाळी करून सायंकाळी ७ वाजता कळवा येथील घरी जात होते. रात्री ९.२० च्यादरम्यान धावत्या जलद लोकलमधून कळवा रेल्वे स्थानकातील चौथ्या फलाटावर उतरण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकल्याने ते पडले. डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348