इतर महानगरपालिकेच्या तुलनेत मिरा भाईंदर महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उत्तम.
नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- केंद्र सरकारमार्फत इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड ची टीम मिरा भाईंदर शहरात दाखल झाली होती. दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात घनकचरा प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी करावयाच्या मूल्यांकन बाबत सदर टीम मिरा भाईंदर शहरात दाखल झाली होती. शहरातील कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया याबाबत केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाने संपूर्ण भारतामधून 61 दशलक्ष शहरांपैकी 25 शहरांची निवड केली आहे. या शहरातील कचरा व्यवस्थापनात काही त्रुटी असल्यास त्यावर शिफारशी शासनाला सादर करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांनी शहराला भेट दिली.
सदर टीमद्वारे मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व बायोगॅस प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. महापालिका मार्फत कचऱ्यावर करण्यात येणारी प्रक्रिया, कंपोस्ट खत गुणवत्ता, कचरा विलगीकरण इत्यादी कामांची पाहणी टीमने केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये कचऱ्यावर उत्तमरीत्या प्रक्रिया केली जाते अशी प्रतिक्रिया इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड च्या प्रतिनिधींनी दिली. गुणवत्ता, ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खतची गुणवत्ता चांगल्या प्रकारची असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर नवघर, आरक्षण क्रमांक 140 व कनाकिया येथील बायोगॅस प्रकल्पाला सुद्धा भेट देण्यात आली. सदर बायोगॅस प्रकल्प हे सुरू करण्यात आले असून उर्वरित प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असल्याने ते लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सांगण्यात आले. सुरू असलेल्या बायोगॅस प्रकल्पाची स्थिती उत्तम असल्याचे इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड च्या प्रतिनिधींनी सांगितले. याआधी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड च्या प्रतिनिधींनी इतर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनास भेट दिली असता मिरा भाईंदर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उत्तमरीत्या सुरू असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.