संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज : ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यामध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई चे निराकरण करणे व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बी. आर. सी. हॉल, पंचायत समिती राजुराच्या सभागृहात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई नियोजन आढावा बैठक पार पडली.
आमदार सुभाष धोटे यांनी तालुक्यातील उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अडचणी, सुचना ऐकून घेतल्या नंतर संबंधित विभागांना सुचाना केल्या की, ज्या ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे, किंवा अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी टंचाई आहे तेथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून वरिष्ठ पातळीवर, शासनाकडे, पाठपुरावा करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजुरा तालुक्यातील नोकरी खुर्द, चार्ली येथे अधिकाऱ्यास आपण प्रत्यक्ष भेट देऊन येथील पाणी पुरवठा योजनेची वस्तूस्थिती, अडचणी तपासून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर भर द्यावा. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड व या सारख्या अपायकारक घटकांचे प्रमाण जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे सांगितले. आवश्यकतेनुसार नवीन हातपंप बसविने, हातपंपाची दुरूस्ती करणे, विहिरीचे गाढ काढणे, खासगी बोर, विहीर अधिग्रहण करणे, आवश्यक त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे, जेथे जुन्या पाईपलाईन वारंवार खराब होऊन नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे त्या समस्येचे निराकरण करणे यासंदर्भात सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी तहसीलदार हरिष गाडे, गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता एच. बी. चव्हाण, सहाय्यक भूजल वैज्ञानिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग डॉ. यो. अ. दुबे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता बडकू, सहाय्यक गट विकास अधिकारी धर्मपाल क-हाडे, कनिष्ठ अभियंता सतिश खोब्रागडे यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.