नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिक्षकांचे काम हे जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यांचे आम्हाला समाधान वाटते, असे याप्रसंगी बोलताना सांगितले. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य मोकळेपणाने करावे. शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. सरकारी शाळांवरील पालकांचा विश्वास वाढत असून सरकारी शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे यासमयी नमूद केले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान आज वेंगुर्ला नवा बाग बीच येथील झुलत्या पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला’ पतंग महोत्सवाचे उद्घाटन आणि वेंगुर्ला नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करण्यात आले.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, राजन तेली तसेच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातील हजारो शिक्षक उपस्थित होते.

