तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री श्री. हंसराज अहीर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मनसुख मंडावीया यांच्याशी चंद्रपूर येथील सेंटर फॉर रिसर्च, मैनेजमेंट अॅन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथी, आयसीएमआर केंद्रा मध्ये जिन थेरपी उपचार सुविधा आणि रक्त तपासणीसाठी न्युक्लीक अॅसीड टेस्ट (NAT) मशिन उपलब्ध करुन देण्याची यासोबतच अन्य काही मागण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
मान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते 11 डिसेंबर, 2022 रोजी चंद्रपूर येथील सिकलसेल हिमोग्लोबिनोपॅथी सेंटर (ICMR) चे उद्घाटन केले होते. या केंद्रामध्ये जिन थेरपी ही उपचार पध्दती थैलेसिमिया मेजर, सिकलसेल, हिमोफिलीया आदि आजारांवर उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त असून सध्या प्रगत देशांमध्ये वर उल्लेख केलेल्या आजारांवर उपचार करण्यासाठी जिन थेरपीचा उपयोग केला जातो. चंद्रपूर येथील एनआयआयएच (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी) मध्ये स्टेम सेल प्रत्यार्पण संयंत्र लावले जावे, बोन मॅरो देणाऱ्या नागरीकांची नोंद केली जावी या मागण्याही अहीर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांचेकडे केल्या.
यावेळी अमेरीकेतील जगप्रसिध्द जिन थेरपी संशोधक डॉ. संदीप सोनी, रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियन हॉनररी फेलोशीप करिता निवड झालेले प्रोफे डॉ. एन के मेहरा, एम्स दिल्ली चे हिमेटोलॉजी विभागाचे पूर्व एचओडी डॉ. व्हि.पी. चौधरी, नॅशनल थॅलेसेमीया वेलफेअर सोसायटीचे डॉ. जे.एस. अरोरा प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी देखील मंत्री महोदयांना व आयसीएमआर चे महासंचालक राजीव बहल यांना जगात होत असलेल्या जिन थेरपी संशोधन व वापर याबाबत अवगत केले.
चंद्रपूर येथील सिकलसेल हिमोग्लोबिनोपॅथी सेंटर (ICMR) मध्ये न्यूक्लिक अॅसिड टेस्ट (NAT) मशिन लावण्याची मागणी अहीर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली. रुग्णाला रक्त देण्यापूर्वी रक्ताची संपुर्ण तपासणी करणे गरजेचे असते. NAT मशिन च्या माध्यमातून रक्त दिल्यानंतर संक्रमित होणारे आजार शोधता येते यामुळे रुग्णाला शुध्द व निरोगी रक्त प्राप्त होऊ शकते तसेच अन्य आजारांचे रक्तामधून होणारे संक्रमण रोखता येते.
हंसराज अहीर यांनी सदर NAT मशिन वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर व जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथेही प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे केली आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये NAT मशिन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.