मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा निमित्त महाराष्ट्रातील शिधापत्रिका वरील स्वस्त धान्य मिळणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत. हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 1 कोटी 63 लाख स्वस्त धान्य मिळणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. यापूर्वी देखील शासनाने दिवाळीच्या सणानिमितत हा आनंदाचा शिधा दिला होता.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.