देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- श्रमदान हा वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांचा आवडता विषय असल्याने गाडगेबाबांनी समाजात झाडू मारुनच स्वच्छता करायची असा चंग बांधला.एकप्रकारे त्यांनी खराट्याची चळवळ उभी करून स्वच्छता हाच परमेश्वर आहे, अशी शिकवण देवून आरोग्याचा मुलमंत्र त्यांनी समाजाला दिला. अंधश्रद्धेला डोळसपणे पाहायला लावले यातूनच गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव कोहाड यांनी रायपूर (हिंगणा) येथील देश गौरव सुभाषचंद्र बोस वाचनालय आयोजित संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना केले.
संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सिराज (बबलू) शेटे उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनसुरभाई महाजन,शफी शेटे, भास्करराव धार्मिक, दत्तात्रय अड्याळकर, शरद वजरे, चंद्रकांत पराते, इब्राहिम तुरक, मोतीराम कडू, राजू भाऊ मोहोड, आरिफ शेख, लव पाटणकर, सतीश लोखंडे,हमिद शेटे, मस्जिद शेटे व भुतेश्वर धार्मिक उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांनी समाजासाठी व जनसेवेसाठी दिवसांचा प्रत्येक क्षण अर्पण केला व स्वतः वैराग्यपूर्ण जीवन जगत राहिले अशा निष्काम कर्मयोगी गाडगे बाबाचे कार्य समाजात जिवंत ठेवणे हेच बाबांना स्मरण ठरेल अशा आशयाचे विचार या जयंती कार्यक्रमात उप सरपंच सिराज शेटे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
संत गाडगेबाबा समाजवादी समाजसेवक, लोकशिक्षक, विज्ञानवादी, भूतदयावादी व दलितोध्दारक संत या विषयावर शरद वजरे, भास्कर धार्मिक, दत्तात्रय अड्याळकर व राजू भाऊ मोहोड यांनी आपले समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन भास्कर धार्मिक यांनी तर आभार ग्रंथपाल सेवकराम लिखार यांनी मानले.

