✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करणेकामी या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यावरणाशी निगडित विषयांवर चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण संरक्षण, वसुंधरा संवर्धन, ऊर्जाबचती साठी सौर ऊर्जेचा वापर, प्लास्टिक मुक्त मिरा भाईंदर शहर, वृक्ष संवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. महानगर पालिका कार्यक्षेत्रातील 75 शाळांनी या स्पर्धेत भाग घेऊन 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. मा. आयुक्त यांनी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगत मा. आयुक्त यांनी सर्व विद्यार्थ्यांना “आपण भविष्य आहात, पर्यावरण संवर्धनाची व स्वच्छतेची सवय आतापासूनच अंगी बाळगून आपले भविष्य प्रदूषणमुक्त, हरित व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे” असे सांगितले. तद्नंतर मा. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रकला पाहून आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उप-मुख्य उद्यान अधिक्षक हंसराज मेश्राम, नागेश विरकर, शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.