✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहरातील सुशोभीकरण प्रकल्पातील ३२० कामांचा तसेच मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामातील ५२ किलोमीटर लांबीच्या १११ कामांचा, व मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या कामांचा शुभारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज चेंबूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय असलेले हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि सुशोभित होत असल्याचा आनंद होत आहे. मुंबईची दरवर्षी तुंबई होत असल्याचे चित्र आम्हाला बदलायचे आहे. येत्या २ वर्षांत मुंबईतील सर्वच रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याचे याप्रसंगी जाहीर केले. मुंबईत सुरू असलेली ही विकासकामे पाहिली असती तर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमचा नक्कीच अभिमान वाटला असता अशी भावना यासमयी बोलताना व्यक्त केली.
राज्याच्या विकासासाठी निधी आणायला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी वारंवार दिल्लीला जातो महाराष्ट्र राज्याकरिता हवे ते मागून घेऊन येतो, तुम्ही चांगले संबंध ठेवून मागणी केलीत, तर तुम्हाला मदत मिळते. नुसतं घरात बसून काही होत नाही असेही याप्रसंगी निक्षून सांगितले. मुंबई मनपा निवडणूका जवळ येत असून त्या नुसत्या आरोप करून नव्हे तर कामाच्या बळावर जिंकायच्या असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
मुंबईतील रस्ते आणि शहर सुशोभीकरण करून फक्त थांबणार नसून लोकांचे जीवनमान सुधारण्याला आमचे प्राधान्य आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याद्वारे मुंबईकरांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. याशिवाय एसआरए, म्हाडा, पोलीस वसाहती, बीडीडी वसाहती यातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे, त्यासाठी गरज लागल्यास कायद्यात बदल करण्याची देखील आमची तयारी असल्याचे यासमयी जाहीर केले. मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याला आमचे प्राधान्य असल्याचे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
यासमयी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आयुक्त इकबालसिंह चहल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कुर्ल्यातील शिवसेना शाखेला देखील यासमयी भेट देऊन तेथील नोंदवहीत माझा अभिप्राय नोंदवला.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रसाद लाड, आमदार राजहंस सिंह, मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु, शिवसेना महिला संघटक सौ. कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि मुंबई मनपा अधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348