✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट भारतीय सैन्यात भरती होणे आजच्या युवकांसाठी मोठी बाब आहे. हिंगणघाट येथील रा. सुं. बिडकर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स ने सैन्यात भरती होण्याचे सुयश प्राप्त केले आहे. या परिश्रमी कॅडेट्सनी आपल्या पालकांची स्वप्नपूर्ती केली आहे. या पालकांचा त्यांचे पाल्य भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल 25/02/2023 रोजी गुलाबाचे रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय कृष्णराव झोटिंगराव पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. रा. सुं. बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एम. राजुरकर या सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तसेच प्रमुख पाहुणे न्याॅक को-आॅर्डिनेटर डॉ. शरद विहीरकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवी महाकाळे तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही.टी. झाडे व आयोजक लेफ्टनंट डॉ. रमेश एम. भगत या कार्यक्रमास उपस्थित होते.
आयोजक लेफ्टनंट डॉ. रमेश एम. भगत यांनी प्रास्ताविक सादर केले व भारतीय सैन्यात निवड झालेल्या एनसीसी कॅडेटच्या पालकांचा सन्मानित करण्याचे औचित्य साधले. त्यात १) यश गंगाधरराव उमक, २) मनीष भारतसिंग पवार, ३) गौरव अंकुश टिपले, ४) राकेश मोहनदास चुलबुले,५) प्रणय साहेबराव धोटे, ६) निखिल माणिकराव धोटे यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट छात्र सैनिक म्हणून दिनेश बालपांडे, रूतिक वांढरे आणि अंकित वानखेडे यांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एम. राजुरकर यांनी विचार व्यक्त केले की, या नवोदित सैनिकांचा गौरव शब्दात व्यक्त करता येणार नाही. आपली भारतभूमी ही ऐतिहासिक भूमी आहे, विचारांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शहीद भगतसिंग पर्यंत आपण बघतो ते अतुलनीय शौर्य. असेच अतुलनीय शौर्य आपण आपल्या भारतीय सैनिकांमध्ये बघतो आहे असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून नॅक कोऑर्डिनेटर डॉ. शरद विहीरकर यांनी मत व्यक्त करताना स्वतःच्या घरादाराचा विचार न करता देश सेवेसाठी आपले आयुष्य भारतीय सैनिक खर्ची घालतात. सैनिक आपल्या देशाकरिता, नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सतत झटत असतो. त्यामुळे समाजाने सैन्यप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवी महाकाळे मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की, आपले कर्तव्य बजावताना अनेक कठीण प्रसंगातून सैन्याला सामोरे जावे लागते. तरीही देश रक्षणाचा निश्चय उराशी बाळगून भारतीय सैनिक सतत हसत कठीण प्रसंगांना तोंड देतात. आपल्या जीवनाचा मौल्यवान वेळ देशाकरिता खर्ची घालणाऱ्या शूरवीरांना माझा मानाचा सलाम आहे असे व्यक्त केले.
डॉ. व्ही. टी. झाडे यांनी आपल्या या नवोदित जवानांना भावी आयुष्याकरिता खूप खूप मंगलमय शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल पिपरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीनियर अंडर ऑफिसर अंकित वानखेडे यांनी केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348