✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.27:- बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी, याबाबत उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशांना विशिष्ठ वस्तुंची कीट उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर ही कीट उपलब्ध करून द्यावी, अशी सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केली होती. त्याला चांगला प्रतिसाद देत 118 ग्रामपंचायतींनी 245 आशांना ही कीट उपलब्ध करून दिली आहे. लवकरच सर्वच आशांना कीट उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागामध्ये आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागामध्ये 1 हजार 33 आशा स्वयंसेविका ही योजना प्रभावीपणे राबवित आहे. या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविकांना विविध स्वरूपाच्या आरोग्य विषयक कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यात एचबीएनसी अर्थात घरच्या घरी बालकांची कशी काळजी घ्यावी, या कार्यक्रमाचा समावेश आहे.
आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या घरी जाऊन गृहभेट देणे व भेटीच्या दरम्यान बालकाला पकडण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक, बाळाचे वजन, तापमान घेणे, बाळाला उबदार ठेवण्याच्या पद्धती मातेला समजावून सांगणे, श्वासाची गती मोजणे इत्यादी कृती आशा स्वयंसेविकांना कार्यक्रम दरम्यान करावयाच्या असतात. त्यादृष्टीने आशा स्वयंसेविकेकडे एचबीएनसी कीट व त्यामध्ये डिजिटल घड्याळ, डिजिटल थर्मामीटर, वजन काटा, नवजात बाळा करिता छोटे ब्लॅंकेट, फीडिंग चम्मच, साबन, साबनाचा डब्बा हे साहित्य आवश्यक आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील उपलब्ध अनुदानातून आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी किट उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सुचना केल्या होत्या. या सुचनेला चांगला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतीने आपल्या गावातील 245 आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी किट उपलब्ध करून दिल्या आहे. समुद्रपूर तालुक्यातील 71 पैकी 65 ग्रामपंचायतीनी 118 आशा स्वयसेविकांना कीट उपलब्ध करून दिली आहे. हिंगणघाट तालुक्यात 76 पैकी 36 ग्रामपंचायतीने 63 आशांना किट उपलब्ध करून दिली.
वर्धा तालुक्यात 76 पैकी 7 ग्रामपंचायतीमधील 44 आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील उर्वरित आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध करून देण्याकारिता मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामपंचायतीला सुचना दिल्या आहे. कीट उपलब्धतेमुळे गावपातळीवर आशा स्वयंसेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील नवजात बालकांना आरोग्य विषयक सेवा देण्यास सोईचे होणार आहे. बालमृत्युदर, अर्भक मृत्यू दर कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे. आशा स्वयंसेविकांनी गाव पातळीवर बालकांच्या घरोघरी जाऊन बाळांचे व्यवस्थापन मार्गदर्शक सुचनेनुसार करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348