वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा छळ व हुंडाबळी थांबावे, यासाठीचा कायदा 1 जुलै 1961 रोजी लागू झाला. हे जरी वास्तव असले तरी परंतु आजही हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद, किंवा कमीही झाली नाही. आजही महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो विवाहिता हुंड्याचे बळी ठरत आहे. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे
हुंडाबळीच्या घटनेने पुणे हादरले आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय विविहित महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नात मनासारखा हुंडा दिला नाही म्हणून सासरकडील मंडळी विवाहितेचा मानसिक छळ करत होते. रुकय्या शहनवाज शेख वय 21 वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
रुकय्या शहनवाज शेख या विवाहित महिलेने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करन्यात येत आहे. याबाबत मृतक रुकय्याचे वडील अल्ताफ अन्सारी यांनी दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुकय्याचे पती आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 महिन्यांपूर्वी रुकय्याचा विवाह झाला होता. विवाहच्या काहीच दिवसात रुकय्याचा पती आणि सासू यांनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. लग्नामध्ये तिच्या माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही या गोष्टीवरून तिला अनेक वेळा हिणवले गेले आणि तिचा वारंवार छळ केला जात असे.
लग्नात दिलेल्या भेट वस्तू या भेट वस्तू नसून त्या भिक घातल्या आहेत असे म्हणून रुकय्याला पती आणि सासू मिळून अनेक वेळा घालून पाडून बोलत असत. या सर्व जाचाला कंटाळून रुकय्याने तिच्या रहात्या घरी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुकय्याचे पती शहानवाज कासिम शेख याला पोलिसांनी अटक केली असून तिची सासू राजमा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.