✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात क्राईम ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मर्डर, चोरी, गोळीबार शहरात वाढ झाली आहे. अशीच एक घटना मोमीनपुरा परीसरात घडली होती. काही दिवसांपूर्वी कारची धडक लागल्याने उद्भवलेल्या वादातून पानठेला चालकाला भयभीत करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात तहसील पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आनंद सुरेश ठाकुर वय 28 वर्ष आणि रवि शांताराम लांजेवार वय 38 वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदरी रोड मोमीनपुरा येथे राहणारे फिर्यादी नईम अक्तर अब्दुल अलीम अंसारी यांचा मदिना कॉम्प्लेक्स मोमीनपुरा येथे नईम पान शॉप नावाने पानठेला आहे. फिर्यादी हे त्यांच्या पानठेल्यावर असताना पानठेल्या समोर मोहम्मद सहाबुद्दीन हा दुचाकी गाडीवर बसून चहा पीत होता. यावेळी एका निळ्या रंगाच्या कारने मोहम्मद सहाबुद्दीन यांच्या गाडीला धडक दिली. यानंतर कारमधील तीन ते चार लोकांसोबत सहाबुद्दीन यांचा वाद झाला. त्यावेळी सहाबुद्दीन यांनी गाडी चालकाला कानशिलात मारली. प्रकरण वाढू नये यासाठी आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्ती करत वाद सोडवला.
ते परत आले आणि केला गोळीबार:
त्यानंतर दोन्ही पक्ष आपल्या मार्गाने निघून गेले. फिर्यादी नईम अक्तर अब्दुल अलीम अंसारी हे त्यांच्या पानठेल्याची साफसफाई करीत असताना निळी कार परत आली. तीन ते चार इसम दुपट्टयाने तोंड बांधून होते. ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीने पिस्टल बाहेर काढत हवेत गोळीबार केला. त्यानंतर दुसरी गोळी फिर्यादीच्या दिशेने त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने झाडली; मात्र फिर्यादी खाली बसल्याने त्याना गोळी न लागता पानठेल्याला लागली. त्यानंतर आरोपी हे गाडीसह पळून गेले.
दोन आरोपींना ठोकल्या बेड्या:
या गोळीबार प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस स्टेशन येथे आरोपींच्या विरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत आनंद सुरेश ठाकुर आणि रवि शांताराम लांजेवार यांना अटक करून बेड्या ठोकल्या आहे.

