संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- शहरातील रामनगर परिसरात असलेल्या ‘संविधान पार्क’ बदल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे दिवसाढवळ्या दारू पिण्याचा अड्डा, कचरा भंडार व अतिक्रमणाने ग्रासलेला असून संविधान प्रास्ताविकेचे दिवसाढवळ्या अपमान करण्यात येत असलेल्या दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.
नागपूर येथे G20 संमेलनाच्या प्राश्वभुमिवर नागपुर शहरात सर्विकडे विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. पण दुसरीकडे अतिशय विरोधाभासी चित्र दिसून येत आहे. भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक नागरिकांना व्हावी या उदात्त हेतूने शहरातील रामनगर चौकातही लाखो रुपये खर्चून ‘संविधान पार्क’ची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज या पार्कची अतिशय दयनीय अवस्था आहे. संविधान पार्कच्या मागे लोकं लघुशंका करतात. रात्री प्रास्ताविकेच्या पुढे दारू पिण्यात येत आहे. सध्या हा संपूर्ण परिसर कचरामय झालेला आहे. इतकेच नाही तर बाजूच्या भंगारवाल्यांनी भंगाराचे साहित्य ठेवले आहे. संविधानाच्या होत असलेल्या अवहेलनाचे चित्र बघून आज प्रत्येक व्यक्तीची मान खाली जाणार. अशी भीषण वास्तविकता संविधान प्रास्ताविकेची आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले. नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार सर्वकाही संविधानात अंगीकृत आहे. मात्र, नागरिकांनी याला फाटा देत संविधान प्रास्ताविकेला भंगार, कचरा आणि दारूत बुडविले. लोकशाहीची मूल्ये प्रत्येकात रुजावी यासाठी संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ओळख, संविधान दिन साजरा करणे आदी उपक्रम सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येतात. याच हेतूने तत्कालीन आमदार निधीतून महापालिकेने रामनगर चौकात ‘संविधान पार्क’ तयार केले. येथे इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत संविधान प्रास्ताविकेची प्रतिकृती उभारण्यात आली. त्यासमोरच अशोक स्तंभही साकारण्यात आला आहे. गेट आणि लाईट्सची व्यवस्थासुद्धा आहे. मात्र, केवळ नावासाठी मोठमोठ्या वास्तू उभारून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
मुतारी, दारूअड्ड्यामुळे नाराजी
संविधान प्रास्ताविका परिसरात रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वाच्या लोकांचे वास्तव्य असते. याच परिसरात दारू पितात. पार्कच्या मागे लघुशंकाही करतात. उष्टे अन्न तेथे फेकतात. जागोजागी घाण व कचरा साचलेला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
जनतेच्या पैशातून महापालिकेने उभारलेले ‘संविधान पार्क’ आज केवळ नावालाच उभे आहे. मागील तीन-चार वर्षांपासून याचे काम सुरू होते. लाखो रुपये खर्च करण्यात आले. पार्कचे काम पूर्ण होऊन जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला.
रामनगर चौकात आल्यावर तुम्ही संविधान पार्क शोधाल तर तुम्हाला जवळ गेल्यावरही ते दिसणार नाही. सभोवताल अतिक्रमण वाढले आहे. महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी भला मोठा फलक लावण्यात आला. त्यामुळे संविधान पार्क दबले गेले. त्यासमोर फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. इतकेच नाही तर बाजूला असलेल्या भंगारवाल्याने आपले साहित्य तेथे ठेवले आहे. त्यामुळे जवळ जाऊनही संविधान पार्क दिसत नाही. महापालिकेने केलेला हा खर्च निव्वळ पाण्यात गेला.
बांधकाम पूर्ण होऊनही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही. रात्रीला लाईट लावले जात नाही. त्यामुळे असामाजिक तत्त्वाच्या लोकांचे चांगलेच फावते. सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना पोलिसांना दिसत नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. धरमपेठ झोनच्या प्रभाग १३ मध्ये हा परिसर येतो. महापालिका आयुक्तांसह धरमपेठ झोनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक व्हावी, अशी मागणी होत आहे.