संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपुर:- शहरातील जरिपटका येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जरिपटका परिसरातील जिंजल मॉल रोडवरील कॅनरा बॅकेची एटीएम मशीन चोरट्याने गॅस कटरद्वारे फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एटीएमला आग लागल्याने चोरट्यांनी गॅस कटर तिथेच ठेऊन पसार झाले. ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दि. 29 रोजी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास हे एटीएम फोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरिपटका परिसरात असलेल्या मेकोसाबाग कब्रस्तान जवळ असलेल्या जिंजल मॉल रोड येथे कॅनरा बॅंकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता दुचाकीवरुन तीन युवक तेथे आले. त्यांच्या जवळ गॅस कटर, सिलींडर आणि एटीएम कापण्यासाठी लागणारे विविध उपकरणे होती. त्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीवर कपडा टाकला. त्यानंतर गॅस कटर आणि इतर उपकरणांच्या साह्याने मशीन कापत होते. खुप खटाटोप केल्यावर आरोपी एटीएमच्या लॉकरपर्यंत पोहोचले. दरम्यान गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली. ही आग पसरेल या भितीने चोरटे तिथून पसार झाले. सकाळच्या सुमारास नागरिकांना एटीएममध्ये काहीतरी जळाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
त्यांनी एटीएमची पाहणी केली. तिथे गॅस कटर आढळून आले. यावेळी बॅंकेच्या मदतीने तेथील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी तीन जणांनी शिरुन एटीएम गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्न केल्याची बाब समोर आली. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.