विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लाखांदूर:- संविधानाचे उल्लंघन करणे बंद करा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा यासह अन्य मागण्यांसाठी येथील बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर दि. 10 एप्रिल सोमवार ला मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
सविस्तर असे की, येथील बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात ६ ते ९ एप्रिलपर्यंत तालुक्यात संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दिघोरी मोठी येथून या संविधान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली तालुक्यातील सर्वच गावांतून काढण्यात आली. रॅलीचे मुख्य संयोजक चंद्रशेखर टेंभूर्णे, संयोजक मनोज बंसोड, बुद्धिष्ट संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष मंगेश सुखदेवे, संदीप मोटघरे, प्रकाश बारसागडे, बबन गजभिये, अनिल काणेकर, प्रा. उद्धव रंगारी, गोपाल मेंढे, जितू सुखदेवे, नगरसेनक गोलू सुखदेवे, निर्भय गायकवाड यांच्यासह भारतीय संविधानाचे अभ्यासक, त्याला मानणारा वर्ग व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण तालुक्यात जनजागृती झाल्यानंतर दि. 10 एप्रिल सोमवार ला स्थानिक त्रिरत्न बौद्ध विहारातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. तेथून तीन किमी अंतरावर असलेल्या तहसील कार्यालया पर्यंत मोर्चात सहभागी सर्वजण पायी गेले. मोर्चातील बांधवांसाठी तालुका काँग्रेस कमिटीने पिण्याचे थंड पाणी व चहाची व्यवस्था केली होती. येथील तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात संविधानाचे उल्लंघन करणे बंद करा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देऊन सन्मानित करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया बंद करा, शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करा, खासगीकरण बंद करा, अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे द्या घरकुल निधीत तीन लाखांपर्यंत वाढ करा, शालेय अभ्यासक्रमातून भारतीय संविधान शिकविण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

