पेरमिली येथे महाराजस्व अभियान संपन्न. शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.
मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांसाठी शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागतात. त्यामुळे त्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्य होतो. महाराजस्व अभिनामुळे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून शासन प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले असून लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. एकंदरीत महाराजस्व अभियान म्हणजे ‘शासन आपल्या दारी’ हीच खरी संकल्पना आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
अहेरी तहसील कार्यालयाच्या वतीने पेरमीली येथे घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, ‘महाराजस्व अभियान’ शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पेरमिली मंडळ कार्यालय परिसरात घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाचे उदघाटन माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील सरपंच किरण नैताम तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री अंकित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी दिनकर खोत, नायब तहसीलदार फारुख शेख, नायब तहसीलदार एन डी दाते, नायब तहसीलदार कल्पना सुरपाम, मंडळ अधिकारी डी डी कुडमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाग्यश्री आत्राम म्हणाले, महाराजस्व अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून याचा लाभ केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर दुर्गम व अतिदुर्गम भागातील जास्तीत जास्त लोकांना मिळणार आहे. शासकीय योजना पासून ग्रामीण भागातील गरजू व वंचित असणाऱ्या पात्र नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून प्रत्येक गावात शासकीय यंत्रणा लाभ मिळवून देण्यासाठी तयार आहे. मात्र,आता दुर्गम भागातील जनता पुढे येऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
अभियानात महसूल प्रशासन, कृषी विभाग,आरोग्य विभाग, अन्न व पुरवठा विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत विभाग, संजय गांधी निराधार आदी विभागांनी स्टॉल लावून लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 25 जात प्रमाणपत्र, 289 अधिवास प्रमाणपत्र, 102 शिधापत्रिका, 2197 उत्पन्न दाखले,1530 रहिवासी दाखले, 55 ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, 30 संजय गांधी निराधार योजना कार्ड,120 जॉब कार्ड वितरण करण्यात आले. यावेळी पेरमेली महसूल मंडळ कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पेरमिली, चंद्रा, आलदंडी, पल्ले, आरेंदा, रापेल्ली, कोरेली, कवठाराम, येरमनार आधी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.