प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने महाराष्ट्रातील 14 नागरिकांचा बळी घेतला? त्यामुळे राज्य सरकारवर समाज माध्यम, विरोधक आणि सामान्य नागरिकांनी मोठे प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. यावेळी विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ात झालेल्या दुर्दैवी घटनेत 14 बळी गेले. पण या घटनेवर एकदा थातूरमातूर प्रतिक्रिया दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ एक शब्दही बोलायला तयार नाही.
दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने या घटनेवर अद्याप कोणतेही बुलेटिन काढले नाही की पोलीस यावर काही बोलत नाहीत. त्यामुळे खोके सरकार नेमके काय लपवतंय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. त्यातच आता या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले असून श्रीसदस्यांचा मृत्यू केवळ उष्माघातामुळे नव्हे, तर भयंकर चेंगराचेंगरीमुळेच झाल्याचे समोर आल्याने सरकारच्या लपवा छपवीचा भंडाफोडच झाला आहे. या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीने केली आहे.
16 एप्रिल रोजी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ानंतर त्याच दिवशी श्रीसदस्यांचे एकापाठोपाठ एक मृत्यू झाले. उन्हाचा पारा 42 डिग्रीवर गेल्याने तापमानवाढीचा फटका बसला. त्यामुळे हे बळी उष्माघाताने झाल्याचे सांगण्यात आले. त्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले, परंतु प्रत्यक्षात श्रीसदस्यांच्या मृतांचा आकडा तेव्हाच अकरावर गेला होता. गेल्या चार दिवसांत बळींची संख्या 14 वर पोहोचली आहे.
मृतदेहांवर जखमांच्या खुणा कशा?
मृतदेहांवर जखमांच्या खुणा होत्या, उष्माघाताने शरीरावर जखमा होतात काय, असा सवालच मृतांच्या नातेवाईकांनी करत यामागचे खरे कारण शोधा अशी मागणी केली होती आणि दोनच दिवसांत हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ व्हायरल झाले.
महिला, मुले व वृद्धांची पाण्यासाठी तडफड..
पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेल्या टँकरची संख्या कमी होती. त्यातच काही टँकरचे पाणी गरम झाले होते म्हणून सावलीत उभ्या असलेल्या टँकरचे पाणी पिण्यासाठी त्यांनी धाव घेतली. वर आग ओकणारा सूर्य आणि पाणी न मिळाल्याने शेकडो महिला, वृद्ध व लहान मुले तिथेच उष्माघाताने भोवळ येऊन कोसळले. त्यातच कार्यक्रम संपला आणि एकाच वेळी लाखो लोकांचा लोंढा बाहेर पडण्यासाठी धडपडत होता.
व्हीआयपींसाठी एक गेट बंद केले आणि…
व्हीआयपींना लवकर बाहेर पडता यावे यासाठी एक संपूर्ण गेटच बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडल्याने अनेकजण दबले गेले. त्यामुळे परिस्थिती आणखीनच स्फोटक बनली. अफाट गर्दीमुळे त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली नाही. अँम्ब्युलन्सही गर्दीत अडकून पडल्या. मैदानावरील वातावरण भयाण बनले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओमुळे सरकारची लपवाछपवी उघड झाली आहे.
ना टाहो ना हुंदका..
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाला पाठीशी घातले आहे. पनवेल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र नातेवाईकांनी ना टाहो फोडला की ना साधा हुंदका दिला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या श्रीसदस्यांचे नातेवाईक प्रचंड दबावाखाली असल्याची चर्चा सुरू आहे.
हा व्हिडीओ मॉर्फ नाही
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही चेंगराचेंगरीचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केला. ते म्हणाले, हा व्हिडीओ समाजमाध्यमांमधून आलेला आहे. हा मॉर्फ नाही. कारण महाराष्ट्र शासनाची गाडी यात दिसत आहे. हा चेंगरा चेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा, असा सवालही त्यांनी केला.
आपची खारघर पोलिसांकडे तक्रार
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन राज्य सरकारने केले होते. त्यामुळे राज्य सरकार आणि संबंधित शासकीय अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी आज खारघर पोलिसांकडे केली.
सरकारला उपरती, पण…
खारघर येथील दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. ‘सरकार आपल्या दारी’ हा महिला जनता दरबार कार्यक्रम मोकळय़ा जागेत दुपारी 12 ते 5 या वेळेत घेण्यात येऊ नये असे आदेश मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिले. पण हाच निर्णय सरकारने अजून सरसकट सर्व विभाग व संस्थांना लागू न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी किती पापं लपवणार: खासदार संजय राऊत
खारघर दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अव्यवस्था आणि राजकीय मनमानीचे निर्घृण बळी आहेत. श्रीसदस्य चेंगरून मरण पावले आणि सरकारने मृतांचा खरा आकडा आजही लपवला आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. देवेंद्र फडणवीसजी, आता तरी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा. आणखी किती पापं लपवणार आहात? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
कॉण्ट्रक्टर मुख्यमंत्र्यांचा होता का?: आमदार आदित्य ठाकरे
आप्पास्वारींबद्दल आमच्या मनात आदर आणि अभिमान आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ मिळाला ही गौरवाचीच बाब आहे. पण खारघर दुर्घटनेबाबत सरकारकडून अजूनही स्पष्ट भूमिका का मांडली जात नाही? ज्या स्वारींना तुम्ही ‘महाराष्ट्र भूषण’ दिला त्यांच्यावरच वेळेचे खापर फोडून तुम्ही त्यांना दोषी धरता हे कसे काय? या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. व्हीआयपींना गार तंबूत बसवलं, मग भक्तांना रणरणत्या उन्हात का सोडलं. कॉण्ट्रक्टर कोण आहे, मुख्यमंत्र्यांचा माणूस होता का, आता लपवाछपवी कसली चालली आहे याची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
खोके सरकार बरखास्त कराः नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहून खारघर दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेफिकीरपणाचे बळी आहेत. याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, हे सरकारच बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. सरकार वस्तुस्थिती लपवत आहे. खारघरच्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. मात्र सरकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत देऊन सरकार आपली सुटका करून घेत आहे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच आहे. त्यामुळे या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोनदिवसीय अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.