सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- तालुक्यातील वीर शहीद सुपुत्र अमोल गोरे हे अनंतात विलीन झाले. त्यांना लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आला. अरुणाचल प्रदेशमधील कमेंग व्हॅली येथे तैनात असताना वाहून जाणाऱ्या आपल्या सहकारी जवानांना वाचवताना पॅरा रेजिमेंटचे जवान अमोल गोरे यांना 17 एप्रिल रोजी वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज वाशीमजवळील सोनखास या त्यांच्या मूळ गावी हजोरोंच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर शहीद अमोल गोरे यांच्या चार वर्षांच्या चिमुरडया मयूरच्या हाताने आपल्या शहीद वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मन हेलावून टाकणारे हे दृष्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
या वेळी उपस्थितांनी गगन भरारी देणारे घोषणा ‘शहीद अमोल गोरे अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा, अमोल तेरा नाम रहेगा’ भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. शहीद अमोल गोरे यांचे पार्थिव आज पुणे येथून लष्कराच्या वाहनाने वाशीमला आणण्यात आले. वाशीम शहराच्या सीमेजवळ पार्थिव येताच रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी पुष्पवृष्टी करत अमोलला श्रद्धांजली वाहिली. दुपारी 3.30 वाजता त्यांचे पार्थिव सोनखास या मूळ गावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या अमोल यांच्या शेतात सायंकाळी साडेपाच वाजता लष्करी इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमोल यांचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, बहीण उमेशा भिसडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम. यांनीही श्रद्धांजली वाहिली. तसेच पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग आणि लष्कराच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत मानवंदना दिली.
मयूरच्या प्रश्नांनी सर्वच निरुत्तर
शहीद जवान अमोल गोरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचा चार वर्षांचा मुलगा मयूर याला पार्थिवाजवळ नेले असता ‘माझ्या बाबांना काय झाले? त्यांच्या डोक्याला असे का बांधले? ते उठत का नाहीत? मला का बोलत नाहीत? त्यांच्या कपाळाला कुंकू का लावले?’ असे प्रश्न तो विचारत होता. हे ऐकून निरुत्तर झालेल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. छोट्याशा मयूरला त्याच्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच नाहीत, पण आजूबाजूचा आक्रोश आणि हंबरडा ऐकून तोही रडू लागला.